Thursday, March 5, 2020

करियर-कथा : नील आणि त्याचे आईबाबा

नील वैद्यला उत्तम स्वीमर व्हायचे आहे. हा खेळ त्याने करियर म्हणून स्वीकारला आहे. त्याचे आईवडील यात त्याच्यामागे ठामपणे उभे आहेत, किंबहुना ते सर्व मिळुन एक स्वप्न जगत आहेत. त्या स्वप्नाची आणि त्यामागच्या परिश्रमांची ही गोष्ट.

ही गोष्ट आत्ता लिहायचं कारण बारा वर्षांच्या नीलने इतर मुलांसोबत नुकताच केलेला एक राष्ट्रीय विक्रम.

पेण मधील १४ वर्षांखालील सहा मुलांनी रिले पद्धतीने २३३ किमी अंतर समुद्रामध्ये पोहोण्याचा राष्ट्रीय विक्रम नुकताच नोंदविला. याआधी हा विक्रम १६६ किमी अंतराचा होता. रिले पद्धतीत, सतत किमान एक स्पर्धक पाण्यात असणे आवश्यक असते. दि. ५ जानेवारी - सकाळी ६.४२ वाजता ही मुले पाण्यात उतरली, आणि ८ जानेवारीला सकाळी ९.५० वाजता या उपक्रमाची सांगता झाली. यामध्ये धरमतर ते एलिफंटा हे अंतर मुलांनी ६ वेळा पार केले. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये होणार आहे.

समुद्रात सतत तीन तास पोहणं ते ही रात्री, आणि प्रवाहाच्या विरुद्ध, अवघड आहे. प्रत्येक मुलगा बारा तासांहून अधिक पोहला, सुमारे तीन दिवसात मिळून. म्हणजे रोज सरासरी चार तास, आणि उर्वरित वेळ बोटीवर, पूर्ण हेलकावे घेणारं सागरी जीवन. यासाठी मुलांकडे प्रचंड निग्रह हवा, पूर्वतयारी हवी, आणि आर्थिक जुळवाजुळव करण्याची पालकांची क्षमता आणि इच्छाशक्तीही हवी.

यातून ही गोष्ट तयार होत गेली. पालक आणि बालक यांची सॉलिड टीम असेल तरच अशी ध्येये गाठता येतील. नील आणि त्याचे आईबाबा हे कसे जमवीत आहेत?

नील सकाळी साडेपाच सहाला उठतो. आधी पळण्याचा व्यायाम करतो, नंतर स्विमिंग पूलवर सरावाला जातो. नऊला घरी येतो, खाऊन-पिऊन तासभर अभ्यास करून शाळेत जातो. दिवसभर शाळा करतो, संध्याकाळी ७ ते ९ पुन्हा स्विमिंग पूल. घरी येऊन जेवण आणि साडेदहा-अकरापर्यंत झोपतो. पेणचा स्विमिंग पूल छोटा आहे (२५ मीटर), म्हणून विकएंड ला मोठा पूल (५० मीटर) आणि एक्स्पर्ट गायडन्स मिळण्यासाठी ठाण्यात जातो.

नीलची आई youtube आणि इतर ठिकाणी शोध घेऊन नीलच्या आहाराकडे लक्ष पुरविते. प्रोटिन्स युक्त शाकाहारी पदार्थ शोधते आणि करते. नीलचे बाबा त्याला सगळीकडे स्पर्धा आणि सरावासाठी घेऊन जातात. तिघेही मोटिव्हेटेड आहेत, ध्येयाने झपाटले आहेत.

नीलला त्याचा सर्वात आवडता वेळ विचारला तर तो स्विमिंगचा असे सांगत नाही. 'मोबाईल हातात मिळतो तो वेळ' असेच उत्तर तो देतो. मात्र तो वेळ त्याला सहजी मिळालेला नसतो, तो त्याने कष्टाने (ध्येयपूर्तीसाठी आवश्यक सराव केल्यानंतर) मिळविलेला असतो. सातत्यपूर्ण रीतीने रोजचा दिवस कारणी लागल्यानंतर मिळालेला हा वेळ आणि इतर काही ध्येय नसल्याने चाळा म्हणून परत परत हातात आलेला मोबाईल यातला फरक महत्वाचा आहे हे प्रत्येक पालक-बालकाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. करमणुक आणि करियरमधील गुंतवणूक यातील तारतम्य राखले पाहिजे.

यातील सर्वात मोठी गोष्ट आहे, 'ध्येय गवसणे'. कलाम म्हणतात की ध्येयहीन माणूस या पायावरचा भार त्या पायावर असे जागच्याजागी करीत असतो, तो जात कुठेच नाही, मात्र आपण खूप काही करतो आहोत असे त्याला वाटते. हे करून पाहा, ते करून पाहा यात त्याचा सारा वेळ निघून जातो. ध्येय असलं, त्याच्या प्राप्तीचा निग्रह असला, आणि त्यासाठी चालायची वाट आखली की सोपं होतं. पुढे जात राहता येतं.

नीलला त्याचे ध्येय अपघातानेच गवसले. त्याची सुरुवात झाली किक बॉक्सिंग पासून. रोजचे प्रशिक्षण मिळत नाही म्हणून स्टॅमिना राखण्यासाठी त्याने पोहायला सुरवात केली, आणि नंतर त्याचीच गोडी लागली. एकदा स्विमिंग हे करियर ठरविल्यावर त्यासाठी आवश्यक दिनक्रम आखला आणि त्यावर तो अग्रेसर आहे.

बायथेलॉन म्हणजे पळणे-पोहोणे-पळणे अशी संयुक्त स्पर्धा. या स्पर्धाप्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर नील एकूण पाच वेळा सहभागी आणि विजयी झाला आहे. अशा नव्या स्पर्धाप्रकारांचा शोध घेणे, त्यातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय रेकॉर्डस्, आणि त्या तुलनेत नीलचा परफॉर्मन्स यावर त्याचे आईवडील लक्ष ठेऊन असतात. इंटरनेट, गुगल यांचा सुयोग्य वापर किती उपयोगी ठरू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

यशाकडे नेणारा प्रवास नेहमीच कष्टप्रद असतो. आऊट ऑफ द वे जाऊन खूप गोष्टी करण्यासाठी भाग पाडणारा असतो. खराब हायवेवरून पेण-ठाणे प्रवास दर विकएंडला सातत्याने करीत राहणे हेच एक मोठे आव्हान होते. ठिकठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मुलाला घेऊन जाणे हेही आव्हानात्मक आहे. अभ्यास, निरीक्षण, विश्लेषण, निवड आणि कार्यवाही याची अनेक आवर्तने सातत्याने करीत राहिले तर आणि तरच शाश्वत यशाचा मार्ग प्रशस्त होत असतो.

खेळामध्ये अशाप्रकारे उज्ज्वल यश संपादन करीत असताना शाळेच्या अभ्यासात नील कधीच मागे पडला नाही. पहिल्या पाचात नेहमीच असणाऱ्या नीलने विविध ऑलिम्पियाड स्पर्धांमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. भव्यदिव्य स्वप्नांचा पाठलाग करताना चित्तवृत्ती धारदार होत असाव्यात. त्यामुळे नेमका केलेला अभ्यासही उत्तम यश देऊन जात असावा.

विविध खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येकी १३ पदके मिळविली असली तरीही नीलची गोष्ट अजून बरीच बाकी आहे. अजून खूप वाटचाल त्याला आणि त्याच्या आईवडिलांना करायची आहे.

सध्या, या टप्प्यावर त्याला शाब्बास म्हणून शुभेच्छा देताना पालक-बालकांनी या गोष्टीतून ध्येयनिश्चीती, ध्येयपूर्तीसाठी मार्गनिश्चिती आणि त्या मार्गावर सातत्याने अग्रेसर राहणे इतके शिकले तर ही गोष्ट सफल होईल.